डलहौसीच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या सुधारणा झाल्या. 1853 मध्ये थाॅमसनच्या व्यवस्थेनुसार वायव्य प्रांत, दक्षिण बंगाल आणि पंजाबमध्ये भारतीय भाषांमधून शिक्षणाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. आवश्यकतेनुसार भिन्न भिन्न परिस्थिती लक्षात घेऊन त्यात बदल करण्यात आले. मद्रास व मुंबईमध्ये अशाच प्रकारचा आदेश देण्यात आला. जुलै 1854 मध्ये नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष असलेला चार्ल्स वूड ह्यांना भारत सरकारला एक नवी योजना पाठवली. ती 'वूडचा अहवाल' म्हणून ओळखली जाते. त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षणासाठी एक व्यापक योजना तयार करण्यात आली. ही योजना इतकी व्यापक होती की, लॉर्ड डलहौसीच्या शब्दात 'काही करावयाचे शिल्लक ठेवले नाही.' आधुनिक शिक्षण पद्धतीची ही आधार्शिला होय. त्यात जिल्ह्यांमध्ये इंग्रजी- भारतीय भाषांच्या शाळा, प्रमुख नगरांमध्ये सरकारी महाविद्यालये आणि तीनही प्रेसिडेन्सी नगरात विद्यापीठे स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून स्वयंसेवी संस्थांना अनुदान दिले जाणार होते. त्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आणि हे कार्य सरकारच्या निरीक्षणाखाली व्हावयाचे होते. प्रत्येक प्रांतात एक शिक्षण संचालक नियुक्त करण्यात आला. त्याच्या मदतीसाठी निरीक्षक ठेवण्यात आले. त्यांच्याकडे प्राथमिक स्तरापासून विद्यापीठ स्तरापर्यंतच्या शिक्षण प्रणालीची व्यवस्था ठेवणे व त्यावर नियंत्रण ठेवणे असे काम सोपविण्यात आले. लंडन विद्यापीठाचा आदर्श समोर ठेवून परीक्षा घेण्यासाठी कलकत्ता, मद्रास व मुंबई या तीन प्रेसिडेन्सी नगरात विद्यापीठे स्थापन करण्यात आली. या विद्यापीठांना परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. कायदा आणि सिव्हिल इंजिनीअरिंगच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. रूरकी येथे इंजिनीरिंग महाविद्यालय स्थापन करण्यात आले. इंग्रजी व स्थानिक भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी पाश्चिमात्य विज्ञान आणि तत्त्वज्ञानासाठी इंग्रजी माध्यमच उपयुक्त मानले गेले.
1825 नंतर इंग्लंडमध्ये रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू झाले. डलहौसीच्या कारकिर्दीत 1853 मध्ये मुंबई ते ठाणे असे रूळ टाकण्यात आले आणि अल्पावधीतच संपूर्ण भारतीय साम्राज्य रेल्वेच्या एका सूत्रात बांधले गेले. भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि अंतर्गत दळणवळणाच्या सोयीसाठी महत्त्वाचा रेल्वे मार्ग यांचे कार्य करण्यात आले. या संपूर्ण योजनेची विस्तृत रूपरेखा डलहौसीने प्रसिद्ध केलेल्या रेल्वे पत्रात देण्यात आली आणि ही रूपरेखा भारतातील रेल्वेच्या भावी प्रसाराचा आधार बनली. 1854 मध्ये कलकत्त्यापासून कोळसा खाणींच्या क्षेत्रातील राणीगंजपर्यंत रेल्वेचे काम झाले. अशाप्रकारे मद्रास आणि इतरही रेल्वेमार्ग तयार झाले. त्यानंतर रेल्वेमार्ग तयार करणे हे काम अखंड चालत राहिले. रेल्वेमार्गांसाठी सर्वेक्षण करणे हे काम अखंड चालत राहिले. या रेल्वेमार्गांसाठी लागणारा पैसा भारत सरकारच्या खजिन्यातून दिला जात नव्हता. त्यासाठी खासगी कंत्राट पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे सरकारी खजिन्यावर भार पडला नाही आणि इंग्रज भांडवलदारांना भांडवल पुरवण्याची संधी मिळाली. पुढील काळात मात्र रेल्वेचे काम खाजगी कंपन्यांकडे सोपवण्यात आले. त्यांना सरकारकडून नफ्याचे आश्वासन होते. त्यासाठी डलहौसीने आधीच केलेल्या सूचनांनुसार निश्चित योजना होत्या. रेल्वे सुधारणेचा महत्त्वाचा फायदा म्हणजे संपूर्ण देश एका सूत्रात बांधल्या जाऊन जनतेत ऐक्य निर्माण होण्यास मदत झाली. ह्याशिवाय अतिदूर वाटणारे अंतर कमी झाले व त्याचा फायदा व्यापारी क्षेत्राला मिळाला. डलहौसीने भारतात तारायंत्राची सुरुवात केली. 1852 मध्ये ओ शॅघनेसी ह्याला तार विभागाचा अधीक्षक नियुक्त करण्यात आले. या कार्यात अनेक अडचणी होत्या पण त्याच्या कठोर परिश्रमांमुळे जवळजवळ चार हजार मैल लांबीच्या तारा टाकण्यात आल्या. त्यामुळे कलकत्ता, मुंबई, मद्रास, पेशावर अशी दूर-दूरची मोठी शहरे तारांद्वारे परस्परांना जोडण्यात आली. ब्रह्मदेशातही रंगून ते मंडालेदरम्यान तारा टाकण्यात आल्या. अठराशे सत्तावनच्या संघर्षात त्यामुळे इंग्रजांना खूप सोयीचे झाले.
आधुनिक काळातील डाक व्यवस्थेचे मूळ आपल्याला दहा वर्षाच्या कारकिर्दीत आढळून येते. एका तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार 1854 मध्ये एक नवा पोस्ट ऑफिस कायदा संमत करण्यात आला. त्यानूसार तिनही इलाख्यातील डाकघरांवर देखरेख ठेवण्यासाठी एक महानिदेशक नियुक्त करण्यात आला. संपूर्ण देशात अंतराचा विचार न करता कुठेही पत्र पाठवण्यासाठी दोन पैसे दर लावण्यात आला आणि प्रथमच तिकीट सुरू करण्यात आले. त्यामुळे सरकारला आतापर्यंत बोजा वाटत असलेला डाक विभाग वरील सुधारणा प्रचलित केल्याने आता उत्पन्नाचे एक साधन बनला. त्या पद्धतीच्या विस्तारामुळे व त्यातील सुधारणांमुळे भारतात सामाजिक प्रशासकीय आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात विकास घडून आला आणि ते सर्व डलहौसीच्या सर्जनशील प्रतिभेचे प्रतीक होय. डलहौसीच्या आधी सार्वजनिक निर्माण कार्य एक लष्करी मंडळ करीत असे. त्याच्या कारकीर्दीत प्रथमच हा विभाग स्वतंत्र करण्यात आला आणि सार्वजनिक कार्यासाठी बराच पैसा खर्च केला जाऊ लागला. सिंचाई कार्याची विस्तृत योजना बनविण्यात आली. गंगेचा मुख्य कालवा तयार झाल्याने 8 एप्रिल 1854 रोजी तो सुरू करण्यात आला. गंगा कालव्याच्या निर्माण कार्याला सुसंस्कृत जातीच्या प्रयत्नातील अद्वितीयत्व महत्त्वपूर्ण कार्य मानले गेले. पंजाबमध्ये बारी दोआबचे निर्माणकार्य सुरू करण्यात आले. अनेक पूल बांधण्यात आले आणि ग्रँड ट्रंक रस्त्याचे काम मोठ्या उत्साहाने व शीघ्र गतीने सुरू करण्यात आले. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी बंदरे खुली करण्यात आली. इंग्रजांनी मुक्त व्यापार धोरणाचे समर्थन केले होते. कराची, मुंबई आणि कलकत्ता या बंदरांचा विकास करण्यात आला. तसेच दीपस्तंभाची सोय करण्यात आली. भारतीय शेतीकडे विशेष लक्ष देण्यात आले. कालवे तयार करणे, रेल्वेचा प्रसार आणि भिन्नभिन्न सार्वजनिक हिताच्या कार्यामुळे भारतीय वाणिज्य क्षेत्रात नव्या युगाचा प्रारंभ झाला व मँचेस्टरच्या कारखान्यांसाठी भारतातून कापूस, चहा, अंबाडी इत्यादीचा कच्चामाल पाठविला जाऊ लागला आणि तेथील कारखान्यातून तयार झालेला स्वस्त माल भारतात अधिकाधिक विकला जाऊ लागला. दिवसेंदिवस भारतीय व्यापार इंग्लंडकडून नियंत्रित होऊ लागला.