प्रथम कर्नाटक युद्ध
सतराव्या आणि अठराव्या शतकात इंग्लंड व फ्रान्स परस्परांचे कट्टर शत्रू होते. त्यामुळे त्यांच्यात युद्ध सुरू झाले की जगाच्या कोणत्याही भागात त्यांच्या कंपन्या एकत्र कार्यरत असल्या म्हणजे त्यांच्यातही युद्ध सुरू होई. ऑस्ट्रियाच्या वारसा युद्धापासून भारतात इंग्रज फ्रेंच संघर्ष सुरू झाला. फ्रेंचाचे भारतातील मुख्य केंद्र पाँडेचरी होते. शिवाय मछलीपट्टनम, कारिकल, माही, सुरत व चंद्रनगर उपकेंद्र होती. इंग्रजांनी आपले बस्तान मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे ठेवले. याव्यतिरिक्त काही उपकेंद्रे होती. युरोपात ऑस्ट्रियाच्या वारसा युद्धाचा प्रारंभ झाल्यावर त्याचा झालेला विस्तार म्हणजे कर्नाटकचे पहिले युद्ध होय. आपल्या मूळ देशांच्या आदेशाविरुद्ध भारतातील इंग्रज व फ्रेंच यांनी 1746 मध्ये संघर्ष सुरू केला. बारनेटच्या नेतृत्वात इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली. म्हणून पाँडेचरीचा फ्रेंच गव्हर्नर डुप्ले ने माॅरीशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोने याची मदत मागितली. त्यानुसार 3000 सैनिकांसह ला बोर्डोने मद्रास जवळील कोरोमंडल तटाकडे निघाला. मार्गात त्याने इंग्रजांच्या आरमाराला पराभूत केले. फ्रेंचांनी जल व स्थल दोन्ही मार्गांनी मद्रासला घेरले. परिणामी मद्रास ने आत्मसमर्पण केले. इंग्रज युद्ध कायद्यांमध्ये रॉबर्ट क्लाइव्हही होता. मद्रास पासून खंडणी घेण्याचा ला बोर्डोनेचा विचार होता. पण डूप्लेला ते मान्य नव्हते. शेवटी एका मोठ्या रकमेच्या मोबदल्यात ला बोर्डोने ने मद्रासचा ताबा सोडून दिला. परंतु त्याला मान्यता डूप्लेने मद्रास पुंन्हा जिंकून घेतले. मात्र पाँडेचरीपासून केवळ अठरा मैल दक्षिणेला असलेला सेंट डेव्हिड किल्ला त्याला जिंकता आला नाही. उलट पाँडेचरी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असफल ठरला.कर्नाटकच्या पहिल्या युद्धातील सेंट टोमे ची लढाई महत्त्वपूर्ण मानली जाते. ही लढाई कर्नाटकचा नवाब अन्वरुद्दीन याच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य आणि फ्रेंच सैन्य यांच्यात झाली. मद्रास फ्रेंचांनी घेतल्यापासून हा संघर्ष सुरू झाला. आपल्या प्रदेशात दोन्ही परकीय कंपन्या लढत असलेल्या पाहून हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशाची शांतता भंग न करण्याची आज्ञा नवाबाने दिली. त्यावर डूप्लेने असा प्रस्ताव मांडला की मद्रास जिंकल्यावर ते नवाबाला दिले जाईल. प्रत्यक्षात मात्र डूप्लेने आपले आश्वासन न पाळल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी नावाबाने सैन्य पाठवले. या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन पॅराडाईज ह्याच्याकडे होते आणि त्या तुकडीत 230 फ्रेंच सैनिक व सातशे भारतीय सैनिक होते. या लहानशा तुकडीने महफूजखाँच्या नेतृत्वाखालील 10000 भारतीय सैनिकांना अड्यार नदीजवळ सेंट टोम येथे पराभूत केले. या विजयामुळे असंघटित व अप्रशिक्षित भारतीय सैन्याच्या तुलनेत प्रशिक्षित भारतीय सैन्याचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले. मात्र एक्स ला शापेल तहानुसार युरोपातील युद्ध बंद होताच प्रथम कर्नाटक युद्धाचीही समाप्ती झाली. मद्रास इंग्रजांना पुन्हा परत मिळाले. युद्धाचे एकूण सारांश म्हणजे युद्धात फ्रेंचांचे वर्चस्व राहिले. डूप्लेने असाधारण कूटनीतीचे प्रदर्शन केले. इंग्रज पाँडेचरी जिंकू शकले नसले तरी त्यातून त्यांना आरमाराचे महत्त्व कळून आले.
द्वितीय कर्नाटक युद्ध
कर्नाटकच्या प्रथम युद्धापासून डूप्लेची राजकीय महत्वकांक्षा वाढली. भारतीय राजांमध्ये सुरू असलेल्या भांडणात भाग घेऊन फ्रेंचाचा राजकीय प्रभाव वाढवण्याचा त्याने निर्णय घेतला. या स्थितीचे वर्णन करताना मॅलेसन म्हणतो, 'महत्त्वाकांक्षा जागृत होऊ लागल्या. परस्पर द्वेष वाढू लागले. युरोपियनांना शांततेशी काहीच देणेघेणे नव्हते. कारण आकांक्षापूर्तीसाठी संधी दार ठोठावत होती. हैदराबादचा निजाम-उल-मुल्क आसफजाह मे 1748 मध्ये मृत्यू पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा नासीरजंग हैदराबादच्या गादीवर बसला. परंतु त्याला निजाम-उल-मुल्क चा नातू मुजफ्फरजंगने आव्हान दिले. त्याचवेळी कर्नाटकचा नवाब अन्वरुद्दीन आणि त्याचा मेहुणा चंदासाहेब यांच्यात संघर्ष निर्माण झाला. लवकरच वरील दोन्ही वादांनी एका मोठ्या विवादाचे रूप धारण केले. कारण राजकीय स्थितीचा लाभ घेत मुजफ्फरजंगला दक्षिणेचा सुभेदार आणि चंदासाहेबास कर्नाटकचा सुभेदार बनवण्यासाठी त्यांना समर्थन देण्याचे ठरवले. स्वभाविकच इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे नासीरजंग व अन्वरुद्दीन यांचा पक्ष उचलून धरला. एकूण डूप्लेला खूप यश मिळाले. मुजफ्फर साहेब व फ्रेंच सैन्याने ऑगस्ट 1749 मध्ये वेलोरजवळ चेंबूर येथे अनवरुद्दीनला पराभूत करून ठार मारले. डिसेंबर 1750 मध्ये एका संघर्षात नासीरजंगसुद्धा मारला गेला. मुजफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला व आपल्या समर्थकांना त्याने बहुमूल्य उपहार दिले. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील मुगल प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून डूप्लेची नियुक्ती करण्यात आली. उत्तर सरकार प्रदेशातील काही जिल्हे फ्रेंचाना मिळाले. शिवाय मुजफ्फरजंगच्या विनंतीवरून बूसीच्या नेतृत्वात एक फ्रेंच तुकडी हैदराबादला तैनात करण्यात आली. चांदसाहेब कर्नाटकचा नवाब बनला. डूप्ले ह्यावेळी आपल्या यशाच्या व राजकीय शक्तीच्या शिखरावर होता.
परंतु लवकरच फ्रेंचांना वेगळ्या स्थितीला तोंड द्यावे लागले. अन्वरुद्दीनचा मुलगा मुहम्मदअली आश्रयार्थ त्रिचनापल्लीला होता. म्हणून चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्याला वेढा घातला. त्याला शह देण्यासाठी इंग्रजांतर्फे रॉबर्ट क्लाईव्हने फक्त 210 सैनिकांसह कर्नाटकची राजधानी असलेले अर्काट जिंकून घेतले. राजधानी अर्काट घेण्यासाठी चंदासाहेबाने 4000 सैनिक पाठवले, परंतु क्लाइव्हने उत्कृष्ट रक्षण केले. फ्रेंच सैन्याच्या ह्या अपयशामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला जोरदार धक्का बसला. त्याचबरोबर त्रिचनापल्ली वाचवण्यात इंग्रजांना यश आले. जून 1752 मधे त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच सैन्याने इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. ह्याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला. त्रिचनापल्लीला झालेल्या फ्रेंचांच्या पराभवामुळे डूप्लेचा चमचमणारा तारा काळ्या ढगात लुप्तप्राय झाला. ह्या युद्धात झालेल्या धनहानीमुळे फ्रेंच कंपनीच्या संचालकांनी डुप्लेला परत बोलावून घेतले. 1754 मध्ये गाॅडेव्हयूला डूप्लेचा उत्तराधिकारी नियुक्त करून भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर बनवण्यात आले. फ्रेंचांनी इंग्रजांशी पाँडेचरीचा तह करून हे युद्ध समाप्त केले. एकंदरीत हे युद्ध अनिर्णित अवस्थेत संपले. जमिनीवरील लढाईत इंग्रजांचे वर्चस्व राहिले. त्यांचे समर्थन प्राप्त असलेला मोहम्मदअली कर्नाटकचा नवाब बनला. मात्र हैद्राबाद राज्यात अजूनही फ्रेंचांची स्थिती चांगली होती. मुजफ्फरजंग एका छोट्याशा संघर्षात मारला गेल्यावर हैदराबादाच्या गादीवर बसलेल्या सलाबतजंगकडून फ्रेंचांनी प्रदेश जागीर म्हणून पदरात पाडून घेतला. 30 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा उत्तर सरकार प्रदेशातील काही जिल्ह्यांचा भूभाग फ्रेंच कंपनीला देण्यात आला. एकूण द्वितीय कर्नाटक युद्धात फ्रेंचांची पिछेहाट झाली तर इंग्रजांची स्थिती सुदृढ बनली.
तृतीय कर्नाटक युद्ध
1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये युद्ध सुरू झाले. ते सप्तवर्षी युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे पडसाद भारतातून इंग्रज फ्रेंच संघर्ष पुन्हा सुरु झाला. फ्रेंच सरकारने ताबडतोब काउंट लाली ह्यास भारतात पाठविले. तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला. यादरम्यान सिराजउद्दौला याला पराभूत करून इंग्रजांनी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते. त्यात इंग्रजांना झालेल्या धनलाभाचा उपयोग त्यांनी फ्रेंचांविरुद्ध लढण्यास केला. काउंट लालीने 1758 मध्येच पाँडेचरीजवळ सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर त्याने तंजावर आक्रमणाचा आदेश दिला. कारण त्यापासून 56 लक्ष रुपये घेणे होते. परंतु या मोहिमेत अपयश आल्याने फ्रेंच प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. म्हणून लालीने मद्रासला वेढा घातला. परंतु इंग्रजांचे शक्तिशाली आरमार आल्याने त्याने हा वेढा उठविला. त्यानंतर लालीने बूसीला हैद्राबादवरून बोलावून घेतले. पण ही त्याची चूक ठरली. कारण त्यामुळे हैदराबादला फ्रेंचांची स्थिती कमजोर झाली. दुसऱ्या बाजूला पोकाॅकच्या नेतृत्वात इंग्रज आरमारी तुकडीने डी ॲशच्या नेतृत्वाखालील फ्रेंच आरमारी तुकडीला तीन वेळा पराजित करून त्यांना भारतीय सागरातून परत जाण्यास बाध्य केले. त्यामुळे इंग्रजांचा विजय स्पष्ट झाला. 1760 मधे इंग्रज सेनानी सर आयरकूटने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला. खुद्द बूसीला युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले. युद्धातील ह्या पराजमुळे फ्रेंच पाँडेचरीला परतले. पण इंग्रजांनी पाँडेचरीला वेढा घातला. आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पाँडेचरी इंग्रजांच्या स्वाधीन केले. लवकरच महत्त्वाचे माही बंदर आणि जिंजी फ्रेंचाच्या हातातून गेले. अशाप्रकारे कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धात त्यांचा अंतिम पराभव झाल्याने हे युद्ध निर्णायक सिद्ध झाले. 1763 च्या परिसराच्या तहाने सप्तवर्षीय युद्ध थांबल्यावर भारतातील संघर्षही समाप्त झाला. या तहानुसार पाँडेचरी व काही प्रदेश फ्रेंचाना परत मिळाला असला तरी त्यांची किल्लाबंदी फ्रेंचाना करता येत नव्हती. भारतातील सत्तास्पर्धेत आता फ्रेंच राहिले नाहीत.
Tags
उपयुक्त माहिती