लॉर्ड वेलस्लीनंतर गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड हेस्टींग्ज आला आणि त्याने पुन्हा साम्राज्यवादी धोरणाचा अवलंब केला. वेलस्लीने भारतात कंपनीचे लष्करी प्रभुत्व निर्माण केले. देशातून फ्रेंचांना हुसकावून लावले. हेस्टिंग्जने भारतात कंपनीला राजकीयदृष्ट्या सर्वोच्च बनवले. वेलस्लीच्या योजनेनुसार त्याने भारतात ब्रिटिश साम्राज्याचा डोलारा उभा केला. हेस्टींग्जला सर्वात प्रथम गुरख्यांशी संघर्ष करावा लागला. पश्चिम हिमालय क्षेत्रातील गुरख्यांनी भाटगावच्या रणजीत मल्लाच्या वारसदारांपासून 1768 मध्ये नेपाळ जिंकून घेतला. काटक अशा गुरख्यांनी अल्पावधीतच नेपाळ शक्तिशाली राज्य बनवून साम्राज्यविस्तारास प्रारंभ केला. उत्तर दिशेकडून त्यांना चीनने अटकाव केल्याने गुरखे दक्षिण सीमेकडे वळले. नेपाळची दक्षिण सीमा अवध आणि बंगालला स्पर्श करीत होती. 1801 मध्ये इंग्रजांनी गोरखपुर बस्ती जिल्हे आपल्या ताब्यात घेतले. तेव्हा इंग्रज व नेपाळची सीमा परस्परांना भिडली. त्यानंतर त्यांनी बस्ती जिल्ह्याच्या उत्तरेकडील भूतवल व शिवराज हे दोन जिल्हे जिंकून घेतल्याने इंग्रज व नेपाळ संघर्षाची ठिणगी पडली. पण लवकरच इंग्रजांनी भूतवाला व शिवराज जिल्हे संघर्षाशिवाय आपल्या ताब्यात घेतले. मात्र वरील घटना म्हणजे त्यांना इंग्रजांचे आपल्यावरील आक्रमण वाटले. म्हणून मे 1814 मध्ये त्यांनी भूतवाल जिल्ह्यातील तीन पोलिस चौकींवर हल्ला चढवला. तेव्हा हेस्टिंग्जने त्वरित युद्धाची घोषणा केली. त्याच्या नेतृत्वाखाली 34000 चे सैन्या तयार करण्यात आले आणि सतलज नदीपासून कोसी नदीपर्यंतचा प्रदेश गुरख्यांविरुद्ध चार ठिकाणी मोर्चेबांधणी करण्यात आली. गुरख्यांजवळ बारा हजार सैन्य होते. प्रारंभिक मोहिमात इंग्रजांना यश मिळाले नाही. कलंगच्या किल्ल्यावरील आक्रमणात अपयशी होऊन इंग्रज सेनानी जनरल गिलेस्पी मारला गेला. त्यानंतर मेजर जनरल मार्टिंडेल अपयशी ठरल्याने इंग्रजांच्या प्रतिष्ठेला जोरदार धक्का बसला. परंतु होतोउत्साह न होता कर्नल निकोलस व गार्डनर यांनी कुमाऊ पर्वतराजीतील अल्मोडा नगर जिंकून घेतले. त्याच सुमारास जनरल ऑक्टरलोनीने अमरसिंह थापासून मालन नगर जिंकून घेतले.
ह्यानंतर गुरख्यांनी तहाचा प्रस्ताव मांडला पण इंग्रजांच्या भरमसाठ मागण्यांमुळे त्यात फारशी प्रगती झाली नाही म्हणून पुन्हा चकमकी सुरू झाल्या. यावेळी लढाईची पूर्ण सूत्रे डेव्हिड ऑक्टरलोनीनेच्या हातात होती. त्याने मोठ्या धाडसाने मोहीम चालवून 28 फेब्रुवारी 1816 रोजी मकवानपुर येथे गुरख्यांना पराभूत केले. परिणामी पुन्हा शांततेची बोलणी सुरु झाली. कारण इंग्रजांसमोर आपला टिकाव लागणार नाही याची त्यांना जाणीव झाली. म्हणून त्यांनी मार्च 2016 मध्ये सगौलीचा तह मान्य केला. हेस्टिंग्जने यावेळी कडक अटी ठेवल्या नाहीत. खरे तर दोन्ही पक्षांनी परस्परांची ताकद जोखल्यानंतरच तहाला मान्यता दिली. या तहापासून कंपनीला विशेष फायदा झाला नाही. फक्त गढवाल व कुमाऊं जिल्ह्यांची प्राप्ती झाली. नेपाळला एक मोठा प्रदेश गमवावा लागला. सीमेवर अर्थात तराई क्षेत्रात पक्के खांब गाडण्यात आले. गुरख्यांनी सिक्कीमवरचा ताबा सोडून दिला व नेपाळची राजधानी काठमांडू येथे ब्रिटिश रेसिडेंट ठेवण्याचे मान्य केले. युद्धकाळात कंपनीने अवधच्या नावाबाकडून एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याऐवजी नवाबाला रोहीलखंड परगण्यातील क्षेत्राचा काही भाग देण्यात आला. कंपनीची वायव्य सीमा हिमालयाला जाऊन भिडली. त्याचबरोबर इंग्रजांना सिमला, मसूरी, राणीखेत, लँडोर व नैनिताल या थंड हवेच्या ठिकाणांची प्राप्ती झाली. त्यामुळे मध्यअशियातील दूरच्या प्रदेशांबरोबरच आवागमनाचे मार्ग मोकळे झाले. एक स्वतंत्र तह सिक्कीमच्या राजाशी करण्यात आला. त्यानूसार तिस्ता व मेची नद्यांमधील प्रदेश राजाला देण्यात आला. कंपनी व नेपाळ यांच्यामधील सीमाही निश्चित करण्यात आल्या. इंग्रज व नेपाळमध्ये झालेला हा तह शेवटपर्यंत कायम राहिला. तहानंतर कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर गुरखे भरती होऊ लागले. त्यामुळे कंपनीला फायदाच झाला. कारण गुरखे लढवय्ये व प्रामाणिक सिद्ध झाले. ब्रिटिश साम्राज्य विस्तारात गुरख्यांचे योगदान महत्त्वाचे होते. तसेच 1857 मध्ये ते इंग्रजांना एकनिष्ठ राहिले.भारतात येण्यापूर्वी हेस्टींग्ज साम्राज्यवादी धोरणावर टीका करत असे. एप्रिल 1791 मध्ये हाऊस ऑफ लाॅर्डमध्ये बोलताना हेस्टिंग्जने टिपू सुलतान विरुद्धच्या मोहिमांवर तसेच साम्राज्यवादी धोरणांवर ताशेरे ओढले. वेलस्लीच्या साम्राज्यवादी धोरणावरही तो टीका करीत असे. हेस्टींग्जचे राजकीय विचार काहीसे वेगळे होते. आपल्या पूर्वजांच्या धोरणाविषयी तो म्हणतो आमची प्रथम योजना म्हणजे स्थानिक संस्थांच्या भानगडीत न पडणे. दुसरे म्हणजे त्या सर्वांना आपल्या नियंत्रणात आणणे. आम्ही अर्ध्या राज्यांना संरक्षण देऊन उरलेल्या अर्ध्या राज्यांना शत्रू बनवले आहे. असा घटनाक्रम संपवायचा होता. त्यांचा धोका त्याला अवगत होता. भयाचे वातावरण समाप्त करून देशात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे आवश्यक होते. फेब्रुवारी 1814 मध्ये तो आपल्या रोजनिशीत लिहितो, "आमचा उद्देश इंग्रज सत्तेला सर्वश्रेष्ठ बनवण्याचा आहे. तसे जाहीर न करता अमलात आणावयाचे आहे. उरलेल्या राज्यांना नाममात्र नव्हे तर वास्तविक आपल्या नियंत्रणाखाली आणावयाचे आहे." हेस्टींग्जने आपल्यासमोर तीन उद्दिष्टे ठेवली होती. पेंढांऱ्यांचा बंदोबस्त करणे. मराठ्यांना कंपनीच्या नियंत्रणाखाली आणणे व लहान राज्यांना इंग्रज संरक्षणाखाली आणणे. अठराव्या शतकातील अराजकतेच्या व गोंधळाच्या वातावरणात पेंढांऱ्यांची संख्या वाढत गेली व त्यांचे कार्यक्षेत्रही वाढत गेले. पेंढांऱ्यांची कोणतेही विशिष्ट जात नव्हती अथवा प्रदेश नव्हता. हिंदू व मुसलमान दोन्ही जमाती असल्याने त्यांचा विशिष्ट धर्म नव्हता. सर्वांचा उद्योग एकच होता आणि तो म्हणजे लूटमार करणे. त्यांची कार्यपद्धती अतिशय गुप्त स्वरूपाची होती. एखादा प्रदेश लुटला गेल्यानंतर त्यांच्या आगमनाची वर्दी लागत असे. अनेक समकालीन इंग्रज लेखकांनी त्यांच्या लुटीचे वर्णन केले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी चीतू, वासिल, मुहंम्मद आणि करीमखाँ असे तीन पेंढांऱ्यांचे पुढारी होते. पेंढारी हळूहळू आपले कार्यक्षेत्र वाढवीत होते. 1812 मध्ये त्यांनी इंग्रजांच्या नियंत्रणाखालील मिर्जापुर व शहाबाद जिल्ह्यांवर आक्रमण केले. 1815 मध्ये निजामाचा प्रदेश लुटला. तर 1816 मध्ये उत्तर सरकार प्रदेश लुटला. लॉर्ड हेस्टींग्जने सैनिक, तोफा जमवल्या. त्याचे दोन भाग करून उत्तरेकडील जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि दक्षिण सेनेचे नेतृत्व थॉमस हीस्लाॅपकडे सोपविले. 1817 पर्यंत पेंढांऱ्यांना चंबळ नदीच्या पलीकडे रेटण्यात आले. आणि जानेवारी अठराशे अठरा पर्यंत त्यांची शक्ती मोडून त्यांचे संघटित दल नष्टभ्रष्ट करण्यात आले. त्यामुळे त्यांचा पुढारी करीमखाँने माल्कमसमोर शरणागती पत्करली. त्याला गोरखपूर जिल्ह्यात एक छोटी जहागिरी देण्यात आली. वासिल मुहम्मदने शिंदेंकडे आश्रय घेतला पण त्याला इंग्रजांकडे सोपवण्यात आले. इंग्रजांनी मुहम्मदला गाजीपुर येथे तुरुंगात ठेवले. अशा प्रकारे त्यांचा पूर्ण बंदोबस्त करण्यात आला.
भारतात कंपनीची सत्ता सर्वश्रेष्ठ बनली असले तरी ते कार्य अपुरे होते. कारण अजूनही मुगल सम्राट सर्वोच्च आहे अशीच सर्वसाधारण समजूत होती. त्यामुळेच हेस्टिंग्जने भारतीय राज्यांवर प्रभुसत्ता निर्माण केली असली तरी मुगल सम्राटाचा असलेला आदर आणि प्रतिष्ठा हीच तिच्या डोळ्यात सलत होती. तोपर्यंत गव्हर्नर जनरलसुद्धा मुघल सम्राटाला लिहिताना अर्जस्वरूपात लिहीत आणि स्वतःला आज्ञाधारी सेवक अशाप्रकारची विशेषणे लावत. गव्हर्नर जनरलच्या शिक्कवरही 'सम्राटाचा सेवक' असे अंकित केले होते. मात्र आपल्या उत्तर भारताच्या दौर्यात हेस्टिंग्जने मोगल सम्राटांशी भेटण्याच्या प्रथा व परंपरा बाजूला सारून समानतेच्या तत्त्वावर सम्राटाची भेट घेतली. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सर्व प्रकारचे शाही अवडंबर टाळून मुगल सम्राट अकबर द्वितीय 1827 मध्ये त्यांच्या नंतरच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड अम्हसर्ट याला भेटला. तरीही 1835 पर्यंत कंपनीच्या मुद्रांवर मुगल सम्राट शहा आलम ह्याचा ठसा होता. हेस्टिंग्स युद्ध क्षेत्रात विजय ठरला असला तरी त्याच्या कारकीर्दीत काही महत्त्वपूर्ण प्रशासकीय सुधारणा झाल्या. त्याच्या भाग्याने त्याला जॉन माल्कम, थॉमस मन्रो, माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जेंकिंस मेटकाफ यांच्यासारखे प्रतिभासंपन्न प्रशासक मंडळी लाभली. थॉमस मन्रो 1820 मध्ये मद्रासचा गव्हर्नर बनला. त्याने मलबार, कन्नड, कोईमत्तूर, मदुराई, डिंडीगल क्षेत्रात भूमी कराची नवी पद्धती लागू केली. ती रयतवारी म्हणून ओळखली जाते. या पद्धतीत जमीनदार वगैरे कोणीही मध्यस्त नसून शेतकऱ्यांना भूमिस्वामी म्हणून त्यांनीच सरकारला सरळ कर द्यायचा होता. पेशव्यकडून मिळालेल्या प्रदेशाची व्यवस्था एलफिन्स्टनने करावयाची होती. त्याने मुंबई इलाख्यात महालवारी, रयतवारी पद्धतीचे मिश्रण असलेली व्यवस्था लागू केली. त्यानुसार जमिनीची पहाणी करून शेतकऱ्यांचा अधिकार निश्चित करण्यात आला. ग्रामव्यवस्था तसेच करसंग्रहाची व्यवस्था पाटील पाहत असे. वायव्येकडील प्रांतात महालवारी पद्धती सुरू करण्यात आली. 1822 च्या अधिनियमानुसार ग्राम संघटनेबरोबर भूमिकरांसंबंधी करार करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याचा हिस्सा ग्रामाने आपसात विचारविनिमयाने ठरत असे. ह्या पद्धतीचा फायदा म्हणजे कर व्यवस्थित मिळत असेल तर कोणाही शेतकऱ्याला विस्थापित केले जात नसे. तसेच असाधारण स्थिती वगळता वृद्धी केली जात नसे. कॉर्नवालिसने सुरू केलेल्या या पद्धतीत हेस्टिंग्जने काही सुधारणा केली. बंगाल प्रांतात कॉर्नवालीसने न्यायालयीन अधिकार आणि प्रशासकीय अधिकार ह्यांची फारकत केली होती. त्यात सुधारणा करून आता कलेक्टरला दंडन्यायाधीशाचे अधिकार देण्यात आले. हेस्टिंग्जने वृत्तपत्रांवरील बंधने शिथिल करून प्रसिद्धी पूर्व नियंत्रण काढून घेतले. मात्र लोकहिताला बाधक ठरतिल तसेच सरकारच्या अधिकाराला आव्हान ठरेल अशा बातम्या देण्यासाठी प्रकाशकांना काही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली.