महात्मा गांधी
(२ ऑक्टोबर १८६९–३० जानेवारी १९४८). मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठन करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. त्या वेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी सातआठ वर्षांचे असताना रंगून जात.
हरिश्चंद्राच्या अद्भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली.
कस्तुरबा आणि मोहनदास यांचे वय सारखेच होते. या दोघांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. ही विद्यार्थी दशा होती. घरचे वातावरण शीलसंपन्नाचे असले, तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निरनिराळ्या कौटुंबिक परिस्थितीत होते. त्यांनी मांसाहार, धुम्रपान, इ. गोष्टींचे प्रलोभन मोहनदासांना दाखविण्याचा प्रयत्न केला. ते त्यात काही काळ फसलेही. परंतु तीव्र पश्चात्ताप होऊन ते त्यातून लवकरच बाहेर पडले.
१८८७ साली ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
१८८५ मध्येच करमचंद यांचे निधन झाले. बेचरजी स्वामी यांनी पुतळीबाईंना सांगितले, की मोहनदासाला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्लंडलापाठवावे. परंतु वैद्याला मृत शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडलापाठवावे असे वडील बंधूंनी ठरविले. मोहनदासांना ही कल्पना फार आवडली. आई या धाकट्याला परदेशी पाठविण्यास नाखूष होती. परंतु मोहनदासांचा आग्रह पाहून तिने त्यांना मद्य, मांस व परस्त्री वर्ज्य करण्याची शपथ घ्यावयास लावली आणि ते १८८८ मध्ये इंग्लंडला गेले. या वेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. अठराव्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला. रामदास व देवदास नंतर काही वर्षांच्या अंतराने झाले.
इंग्लंडमध्ये असताना गांधींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. वडिलांच्याच पायापाशी बसून हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती मित्रांच्या संवादांमध्ये अनेक धर्माच्या तत्त्वांचे जे विचार त्यांनी वारंवार ऐकले, ते इंग्लंडमध्ये गीता, बुद्धचरित्र व बायबल यांच्या वाचनाने अधिक दृढ झाले.
ते १० जून १८९१ रोजी बॅरिस्टर झाले. तत्पूर्वी लंडनची मॅट्रिक परीक्षाही ते उत्तीर्ण झालेच होते. स्वदेशी परतले. मातेचे निधन झाले होते, ही गोष्ट त्यांना परतल्यावर कळली. वडीलभावाने परदेशगमनाबद्दल त्यांच्याकडून प्रायश्चित्त घेवविले.