डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू येथे झाला. डॉ. बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सपकाळ असे होते. त्यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे होते. वडील लष्करात सुभेदार पदावर होते. बाबासाहेब हे त्यांच्या आई-वडिलांचे चौदावे व शेवटचे अपत्य होते. साताऱ्यातील एलिमेंट्री स्कूल मध्ये असताना या शाळेतील कृष्णाजी केशव आंबेडकर या प्रेमळ गुरुजींनी बाबासाहेबांना आपले आंबेडकर हे आडनाव स्वीकारण्यास सांगितले. मुंबईतील एलफिस्टन कॉलेजमधून त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी बाबासाहेबांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीच्या आधारे त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला व एम.ए. ची पदवी संपादन केली. तसेच त्यांनी कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. हि पदवी संपादन केली. बाबासाहेबांना वाचनाची खूप आवड होती. ते सतत दिवसातील सोळा ते अठरा तास अभ्यास करत. राजश्री शाहू महाराजांच्या आर्थिक सहकार्यामुळे बाबासाहेबांनी लंडन विद्यापीठात एम.एस.सी. ही पदवी संपादन केली. तसेच त्यांनी लंडन विद्यापीठाची डी.एस.सी. ही पदवी संपादन केली. याप्रमाणे बाबासाहेबांनी उच्चशिक्षण संपादन केले.
लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बाबासाहेबांनी अगदी कमी कालावधीत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि अनेक उच्च पदव्या संपादन केल्या. या शिक्षणाचा स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी, पैसे कमावण्यासाठी उपयोग न करता त्यांना समाजासाठी कार्य करायचे होते. लहानपणापासूनच जातीभेद, गरीब-श्रीमंत यातील दरी त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे यापुढील काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवून समाजातील असमानता दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी वर्तमानपत्रे काढली. यामध्ये सर्वप्रथम 'मूकनायक' हे पाक्षिक 1920 साली राजश्री शाहू महाराज यांच्या साह्याने सुरू केले. यानंतर 'बहिष्कृत भारत', 'जनता', 'समता', 'प्रबुद्ध भारत' ही वर्तमानपत्रे सुरू केली.डॉ. आंबेडकरांना मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच या भाषा अवगत होत्या. माणगाव येथे 1920 साली भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. आपल्या भाषणातून लोकांना शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश दिला. 1924 साली आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा ही संस्था मुंबई येथे स्थापन केली. अस्पृश्य बांधवांना शिक्षण देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करणे या उद्देशाने ही संस्था कार्य करत होती. भारतात अनेक सुधारणा होत असताना दलित बांधव मात्र त्यापासून वंचित होता. त्यांचे जगण्याचे मूलभूत हक्क सुद्धा डावलले जात होते. त्यांना शिक्षणाचा हक्क नाकारला जात होता.
डॉ. बाबासाहेबांनी 1927 साली आपल्या अनुयायांसह महाड येथे 'चवदार तळे' सत्याग्रह केला. महाड येथील सत्याग्रह परिषदेत 'मनुस्मृती' या धर्मग्रंथाचे दहन बाबासाहेबांनी केले. दलितांना मंदिर प्रवेश नाकारला जात होता, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती.त्यामुळे नाशिक येथील 'काळाराम मंदिरात' सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहामुळे 1935 साली काळाराम मंदिर अस्पृश्य बांधवांना खुले झाले. डॉ. आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिले. यामध्ये 'हू वेअर द शुद्राज', 'बुद्ध अँड हिज धम्म', 'द अनटचेबल्स', 'कास्ट इन इंडिया', 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी', हे यामधील प्रमुख ग्रंथ आहेत. बाबासाहेबांनी आपले ग्रंथ हे प्रामुख्याने इंग्रजी भाषेत लिहिले. 1930 ते 1932 या कालावधीत लंडन येथे तीन गोलमेज परिषदांना अस्पृश्य बांधवांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. आंबेडकर उपस्थित होते. 1942 ते 1946 या काळात गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर मजूर मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्वतंत्र भारताच्या संविधान निर्मितीचे काम भारतीयांनाच करावयाचे होते. यामधील संविधान सभेच्या 'मसुदा समितीचे' अध्यक्ष म्हणून डॉ. आंबेडकर यांची निवड झाली. संविधानाचा मसुदा बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने केले. त्यामुळेच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. पंतप्रधान नेहरूंच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब कायदामंत्री होते. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे 1935 मध्ये झालेल्या सभेत "हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" अशी प्रतिज्ञा बाबासाहेबांनी केली होती.14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूर येथे डॉ. आंबेडकरांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. डॉ. आंबेडकर यांच्यावर गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता. बाबासाहेबांचे हे कार्य भारतातीलच नाही तर जगातील दलित, अस्पृश्य समजल्या जाणार्या लोकांसाठी होते. म्हणूनच शतकातील महान व्यक्तींच्या यादीत डॉक्टर बाबासाहेबांना स्थान देण्यात येते. भारतातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.